Marathi – Introduction

https://www.breakingindia.com/introduction/

 

भारत विखंडनपाश्चिमात्य देशांचा दलित द्रविडीयन समस्यांमध्ये ढवळाढवळ

भारत विखंडनपुस्तक परिचय
लेखक : राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : आर. एम टीम

 

मागील दशकात मला जे विविध अनुभव आले त्यांचा प्रभाव माझ्या संशोधन, अभ्यास व विद्वत्तेवर झाला आणि त्याचीच परिणीती हे पुस्तक लिहिण्यात झाली. सन १९९० मध्ये, प्रिन्स्टन विद्यापीठातील एका कृष्णवर्णीय विद्वानाने मला सहजपणे सांगितले की ते नुकतेच भारतात जाऊन आले आहेत व तेथे ते ‘आफ्रो-दलित प्रकल्पावर’ काम करत आहेत. मला हे पण कळले की अमेरीकेच्या आर्थिक पाठबळावर चाललेल्या या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आंतरजातीय संबंध आणि दलित चळवळीला अमेरिकन सांस्कृतिक व ऐतिहासिक चौकटीत बसवणे हे आहे. आफ्रो-दलित प्रकल्पाचा उद्देश आहे, दलित हे भारतीय ‘कृष्णवर्णीय’ आहेत आणि सवर्ण लोक हे भारतीय ‘गोरे’ आहेत असा प्रचार करणे. अशाप्रकारे अमेरिकेचा वांशिक अत्याचाराचा, गुलामीचा व कृष्णवर्णीय, गोऱ्या लोकांमधील संबंधाचा इतिहास बळजबरीने भारतावर लादला जातो. जरी आधुनिक जातीव्यवस्था आणि आंतरजातीय संबंधात वर्षानुवर्षे दलित लोकांबद्दल दुषित मते होती, तरी दलितांच्या अनुभवात व कृष्णवर्णीयांचा अमेरिकेतील  गुलामीच्या  अनुभवात जमीन अस्मानाचे अंतर आहे. परंतु हा अमेरिकन अनुभवावर आधारित ‘आफ्रो-दलित प्रकल्प’ दलितांना दुसऱ्या वंशाच्या अत्याचाराला पडलेले ‘बळी’ बनवून त्यांचा उद्धार करू पाहत आहे.

 

या व्यतिरिक्त, ‘आर्य’ कोण होते, संस्कृत व वेद हे परकीय आक्रमकांनी, राजवटींनी आणलेली आहेत का त्यांचा स्रोत, पाळेमुळे भारतातील आहेत याचे संशोधन व लिखाण मी करत आहे. या संदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी मी बरीच उत्खननं, भाषांचा अभ्यास, ऐतिहासिक मेळावे व ग्रंथसंग्रह यांना आर्थिक साहाय्य केले. या योगाने मी ब्रिटीश राजवटीद्वारे निर्मित द्रविडीयन अस्मितेवर संशोधन केले, जी सन १९०० च्या पूर्वी अस्तित्वात नव्हती व आर्य अस्मितेला विरोध म्हणून तिची जाणीवपूर्वक निर्मिती करण्यात आली. तिचे अस्तित्व परकीय आर्य व त्यांच्या तथाकथित अत्याचारांवर अवलंबून आहे.

 

भारतातील घडामोडी व योजनांना अमेरिकन चर्चचे आर्थिक पाठबळ, उदाहरणार्थ भरपूर प्रचार केल्या गेलेल्या, अन्नदान करून, कपडे, वस्त्रे व शिक्षण देवून ‘गरीब’ मुलांना वाचवा, यासारख्या योजनांचे संशोधनही मी करत आहे. खरे सांगायचे तर, माझ्या विशीत अमेरिकेत रहात असतांना मी सुद्धा दक्षिण भारतातील एका मुलाला आर्थिक सहाय्य दिले होते. परंतु, मी जेव्हा भारतात जात असे, तेव्हा मला जाणवत असे की या आर्थिक सहाय्याचा उपयोग आधी सांगितल्या गेलेल्या कार्यासाठी न होता धर्मांतरे व बुद्धिभेद पेरण्यासाठी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, भारतीय समाजाला मिळणारी दुय्यम वागणुकीबद्दल ज्या आधारे पाश्चिमात्यांनी त्यांना ‘मानवता’ शिकवावी, यावरून माझे अमेरिकन वैचारिक समुह, विद्वान, मानवी हक्कवादी संस्था व शैक्षणिक समाजाशी असंख्य वादविवाद चालू आहेत. भारताच्या सामाजिक व आर्थिक समस्या ‘या जगाबाहेरील’ आहेत असा सनसनाटी प्रचार करणे व त्यांचा ‘मानवी हक्काशी’ संबंधीत समस्या असा अर्थ लावणे, याला संबोधित करण्यासाठी मी ‘जातपात, गोमाता आणि रस्सा’ (‘कास्ट, काऊ व करी’, ‘Caste, Cow and Curry’) हे एक ब्रीदवाक्य तयार केले आहे.

 

ज्या संस्था अशा नानाप्रकारच्या कल्पनांचा प्रचार करण्यात, तसेच संघटीतपणे राजकीय दबाव आणण्यात आणि कालांतराने मानवी हक्क भंग केल्याचा दावा करत भारताचे नाव कलंकित (persecution) करण्यात गुंतलेल्या आहेत, त्यांच्यावर मी पाळत ठेवणे सुरु केले. अमेरिकेतील आर्थिक पारदर्शिकतेच्या नियमांधारे त्यांना आर्थिक पाठबळ देणारे कोण आहेत याची माहिती काढणे, या संस्थाच्या प्रचार पत्रिकांचा अभ्यास करणे, व त्यांचे मेळावे, प्रशिक्षणे व प्रकाशने यांवर नियंत्रण ठेवणे या सर्वांचा माझ्या संशोधनात समावेश होता. या घडामोडी, कार्यांमागील व्यक्ती व त्यांचे कोणत्या संस्थांशी लागेबांधे आहेत याची मी तपासणी केली.

 

माझ्या हाती जी माहिती आली त्यामुळे ज्या भारतीयांना भारताच्या एकसंधतेबद्दल काळजी वाटते त्यांच्यासाठी धोक्याच्या घंटा वाजायला हव्यात. भारत एका मोठ्या समुहाचे एक मुख्य लक्ष्य आहे व हा समूह अनेकानेक संस्था, चर्चेस, व व्यक्तींच एक मोठं जाळं आहे आणि ते भारतातील गरीब, दुर्लक्षित समाजासाठी नवी अस्मिता, इतिहास आणि धर्मसुद्धा तयार कर पाहत आहेत. या समूहात फक्त चर्च, सरकारी संस्था आणि संबंधित संस्था नसून वैचारिक समुह, शैक्षणिक समाजातील विद्वानांचाही समावेश आहे. वरवर पाहता या संस्थाचा एकमेकांशी काही संबंध नसल्यासारखे वाटते, परंतु मला असा शोध लागला की त्यांच्या कार्यपद्धतींचा एकमेकांशी सखोल संबंध आहे आणि त्यांना अमेरिका व युरोपहून आर्थिक पाठबळ मिळते. त्यांचे सखोल संबंध व सहकार्यामुळे मी खूप प्रभावित झालो. त्यांचे निर्धार, वैचारिक प्रकाशने व नीती सखोल विचाराअंती तयार केलेल्या असतात आणि दुर्लक्षित समाजासाला मदत करण्याच्या पडद्यामागे त्यांचे ठळक उद्देश असतात जे भारताच्या एकसंधता व सर्वाभौमिकतेला बाधा ठरू शकतात.

 

ज्या तथाकथित समाजाचा ‘उद्धार’ केला जातो त्यांच्या प्रतिनिधींचा या संस्थांमध्ये उच्च जागांवर अभाव आहे व या संस्थांच्या प्राथमिक कल्पना,आर्थिक पाठबळ व रणनीती पाश्चात्त्य लोकच ठरवतात. परंतु, आजकाल बराचश्या समाजकार्य करणाऱ्या लोकांना व निमसरकारी संस्थांना आर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन त्यांच्या बाजूने वळविले जाते. अमेरिका व युरोपीय विद्यापीठांतील दक्षिण आशियाई अभ्यासाचा शाखा अशा सक्रीय कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा, महत्व देऊन त्यांना बोलावतात. या संस्था खलिस्तानी, काश्मिरी दहशतवादी, माओवादी, व अन्य भारतविरोधी घटकांना आमंत्रणं देऊन बौद्धिक पाठबळ देतात. यामुळे मी विचार करायला लागलो की भारतातील दलित, द्रविडीयन व अन्य अल्पसंख्याक चळवळी काही पाश्चिमात्य देशांच्या परराष्ट्र धोरणाचा घटक आहेत का, जरी उघडपणे नाही तरी एक जरूर पडेल तेव्हा उपाय म्हणून तरी आहे का. माझ्या माहितीत एकाही मोठा देशात एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या घडामोडी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर चालू नाहीत. यामुळे फुटीरतावादाचे रुपांतर एका शस्त्रात झाल्यावर दहशतवाद किंवा राजकीय विभाजन नियंत्रणात आणण्यासाठी देशाची साधने मोठ्या प्रमाणात खर्ची पडताहेत.

 

शैक्षणिक समाजाने मुद्दाम निर्माण केलेले भेदभाव आणि त्यानंतर झालेले यादवी युद्ध यातील संबंध श्रीलंकेमध्ये ठळकपणे दिसून येतात. ही अशीच भयंकर गोष्ट आफ्रीकामाध्येही झाली जेथे परकीयांनी निर्माण केलेल्या अस्मितेच्या भेदांमुळे जगातील एक सर्वात हीन नरसंहार झाला.

 

साधारण तीन वर्षांपूर्वी माझ्या संशोधनामुळे भरपूर पुरावा गोळा झाला. परंतु, बहुतेक लोकांना भारतविरोधी जे घटक काम करत आहेत त्याची अजिबात काही माहिती नाही व मला जाणवले की या माहितीच्या आधारे लोकजागृती करून त्यावर चर्चा झाल्या पहिजे. मी जमवलेल्या पुराव्यांना बळकटी देण्यासाठी, तामिळनाडू येथे स्थायिक व स्थानिक घडामोडींची भक्कम माहिती असलेले अरविंदन नीलकंदन यांचेबरोबर काम करण्यास सुरुवात केली.

 

द्रविडीयन चळवळीची व दलित अस्मितेची ऐतिहासिक निर्मिती व सुरुवात आणि या फुटीरतावादाला पुष्टी देणारे कोण आहेत याचा आढावा हे पुस्तक घेते. यामध्ये कोणत्या व्यक्तींची व संस्थांची भागीदारी आहे, त्यांच्या प्रेरणा, कार्यक्रम, योजना व मुख्य अंतिम हेतू काय आहे याचा सविस्तर पडताळा केला आहे. जरी बहुतेक संस्था अमेरिका व युरोपमधील  असल्या तरी वाढत्या संख्येने या संस्थांच्या स्थानिक शाखा म्हणून काम करणाऱ्या भारतीय संस्थाही आहेत.

 

या पुस्तकाचा मुळ उद्देश सनसनाटी निर्माण करणे किंवा शेवट काय होईल याचा अंदाज देणे नसून भारत व भारताच्या भविष्याबद्दल चर्चा सुरु करणे हा आहे. भारताचा आर्थिक उदय व त्याचा भारताच्या जागतिक प्रतिष्ठेवर होणारा परिणाम याबद्दल बरेच काही लिहिले जात आहे. परंतु या पुस्तकात उघडकीस आणलेल्या व गतीने वाढत असलेल्या कुटील योजनांमुळे कोणती अनिष्ट संकटे भारतावर येऊ शकतील आणि भारतातील सामाजिक व्यवस्थेवर, भेदांवर येणारे ताण याचेबद्दल काही लिहिले जात नाही. माझी अशी आशा आहे की या पुस्तकाद्वारे काही प्रमाणात ही उणीव भरली जाईल.